मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात नेहमीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आपल्या विविध विधानाने चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ते आपल्या वक्तव्याने चर्चेत आले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर छगन भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे, असे मत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी शरद पवार व भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना व्यक्त केले. निवडणुका आल्यावर सरकारला लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवला का? असा सवालही त्यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला.
संजय राऊत यांनी यावेळी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 280 जागा जिंकणार असल्याचा पुनरुच्चार केला.
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. यावरून राऊतांनी टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ”सरकारवर 8 लाख कोटींच कर्ज आहे. ही काही छोटी-मोठी रक्कम नाही आहे. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर या सरकारने नव्या नव्या योजना जाहीर केल्या. लाडकी बहीण ही योजना तर मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे. आता लाडका भाऊ योजना आणली आहे. लाडक्या भावांना 6 हजार आणि 10 हजार रुपये देणार, आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये ? लाडक्या बहिणीला पण 10 हजार रुपये द्या, तरच त्याचं घर चालेल. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचे घर चालणार कसं?” असा सवाल राऊतांनी राज्य सरकारला केला आहे.
तर विधानसभेबाबत बोलतांना राऊत यांनी म्हंटले आहे की, ”लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाहीत असा दावा महायुतीचे नेते करत होते. मात्र आम्ही 31 जागा जिंकल्या. तर 4 जागांवर अत्यंत कमी फरकाने आमचा पराभव झाला होता. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला 280 जागांवर विजय मिळणार आहे”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.