ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात – शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी

सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा अंतर्गत निर्णय असून, त्यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रमुख खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे नेते असून त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय आहे, असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत कोणतीही घाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी आपली कोणतीही चर्चा झालेली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती. मात्र सध्या त्या प्रक्रियेला खंड पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही भूमिका आहे. गेल्या चार महिन्यांपासून या विषयावर चर्चा सुरू होती. १२ तारखेला विलीनीकरणाबाबत निर्णय जाहीर होणार होता, मात्र त्या बैठकीत आपण सहभागी नव्हतो. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली होती, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त करत शरद पवार म्हणाले की, राज्याच्या हितासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न राहील. पक्षातील नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचे कामही सुरू ठेवू. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याने उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही पक्ष एकत्र येतील का नाही, याबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. मात्र यापुढील चर्चा जयंत पाटील आणि संबंधित नेते करतील. भाजपसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. आमची चर्चा ही पूर्णतः पक्षांतर्गत स्वरूपाची असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!