ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांचा राजकीय खेळ : माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ?

सोलापूर : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरु केली असून आता सोलापूर जिल्ह्यातील देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी महादेव जानकर यांना थेट साद घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. आता महादेव जानकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर स्वागत केले होते.मात्र, त्यांनी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आम्हाला कोणती जागा सोडणार? अशी विचारणा केली. बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्याप्रमाणावर मतदान झाले होते. जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविल्याचे समजते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. त्यात वादाच्या बहुतांश जागांवर मतैक्य झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊतही होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत सुरू झाली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ही बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाविषयी ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असतानाच शरद पवार गटातून अभयसिंह जगताप हे सुद्धा माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी महादेव जानकर यांना घातलेली साद माहीत असली, तरी जानकर महाविकास आघाडीकडून उभारण्यास इच्छुक नसतील, तर माझ्या उमेदवारीचा विचार व्हावा असे मी शरद पवारांना सांगितल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मी फिरलो असून याची माहिती शरद पवारांना दिली. पदाधिकारी सोबत असून आम्ही चर्चा केली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय शरद पवार घेतील असं त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!