ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“शेलारजी फार डिंग्या मारू नका ; आशिष शेलारांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातील ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीने बेस्ट पतपेढी निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. यावरून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

भाजप पक्ष म्हणून आम्ही ‘दि बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक ‘बेस्ट’मध्ये काम करणाऱ्या कामगारांची होती. यामध्ये राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले. त्याचे फळ त्यांना मिळाले आणि हातात भोपळा आला, असं मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी म्हंटल होतं. या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या, शेलारजी फार डिंग्या मारू नका. बॅलेटवर निवडणुका घेतल्या की तुम्ही कायम तोंडघशीच पडता. शिक्षक–पदवीधर–सिनेट निवडणुकीत आम्ही तुम्हाला धोबीपछाड दिलाय. कालच्या निवडणुकीतही तुम्ही तीर मारले नाहीत. तुम्हाला नवख्या आघाडीने चारी मुंड्याचीत केल आहे. तेव्हा गपगार गोधडीत पडा, अशी जहरी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!