---Advertisement---

महाराष्ट्रात आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा ; राज ठाकरेंचे आवाहन !

By team
On: August 21, 2025 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता त्यांनी एक आवाहन केले आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.

मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित केली पाहिजे. इतर राज्यांतील शहरांचा विकास केल्याशिवाय मुंबईवरील ताण कमी होणार नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत मांडले.

राज ठाकरे म्हणाले की, सरकारी जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहतात, पण खासगी जागांवर मात्र कधीही झोपडपट्टी दिसत नाही. याचा अर्थ सरकारला कुठे तरी ठाम भूमिका घ्यावी लागेल. फक्त अर्बन नक्षल यांचा बागुलबुवा निर्माण करून उपयोग नाही. वाहतूक शिस्त हीही एक अत्यंत गरजेची बाब आहे. गौतम अदानी यांच्या घशात जमिनी घातली जात आहे. तिथे काय विकास होणार आहे. उंच इमारती बांधून काही होणार नाही, त्यासाठी जमिनीवर विकास करावा लागेल.

गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, राज ठाकरे यांनी सांगितले की त्यांनी वाहतूक कोंडी, पार्किंग आणि शहर नियोजनावर आधारित सविस्तर आराखडा सरकारला दिला आहे. मैदानी जागांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचे पार्किंग करता येईल, आणि त्या मैदानांचा उपयोग पूर्ववत राहील, असे त्यांनी सूचवले.

राज ठाकरे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलिस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले.

राज ठाकरे म्हणाले की, शहरांमध्ये दररोज माणसं आणि इमारती वाढत आहेत, पण रस्ते मात्र तेवढेच राहिले आहेत. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली अनधिकृत गोष्टी घडत आहेत. पार्किंगची शिस्त लावणं अत्यावश्यक आहे. जे पार्किंग लॉट उभारले आहेत, तिथेही लोक गाड्या लावत नाहीत. ही वृत्ती बदलली पाहिजे. दादरमध्ये 70-80 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दर आहे. तुम्ही रस्त्यावर गाडी पार्क करता तेव्हा ती किती जागा व्यापते हे पाहा. मग पार्किंगसाठी पैसे द्यायला कोणी कचरतं का? सगळं फुकट मिळण्याची अपेक्षा ठेवू नये.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!