ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अहिल्यानगर महापालिकेत शिंदे गटाची ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

अहिल्यानगर वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रत्येक प्रभाग निर्णायक ठरणार असतानाच, अहिल्यानगरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी मोठी राजकीय खेळी खेळत निवडणुकीत नवे वळण दिले आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या ५ उमेदवारांचे एबी फॉर्म तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अधिकृत पक्ष चिन्हापासून वंचित राहिल्याने हे उमेदवार अडचणीत आले होते. मात्र, शिवसेनेने तात्काळ रणनीती बदलत या ५ उमेदवारांसह अन्य ५ अशा एकूण १० अपक्ष उमेदवारांना अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांची ताकद वाढली असून निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून एकूण ५४ उमेदवारांच्या अर्जांसोबत एबी फॉर्म जोडण्यात आले होते. मात्र छाननीदरम्यान त्यातील ५ उमेदवारांचे फॉर्म बाद ठरले. यामुळे पक्षासमोर आव्हान उभे राहिले असतानाच, अपक्षांना पाठिंबा देत शिवसेनेने परिस्थितीवर मात केली आहे.

पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
अश्विनी विलास सांगळे,
उषा मंगेश भिंगारदिवे,
संदीप यादव,
अशोक शामराव दहिफळे,
धनश्री सागर साठे,
अमित दत्तात्रय खामकर,
मंगल गोरख,
हर्षवर्धन कोतकर,
गौरी गणेश ननावरे,
दत्तात्रय खैरे.

दरम्यान, एकीकडे अपक्षांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असताना, दुसरीकडे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी शिवसेनेच्या विजयाचा शंभर टक्के विश्वास व्यक्त करत लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा अहिल्यानगरमध्ये होणार असल्याची घोषणाही केली. या घडामोडींमुळे आता अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि विरोधकांमध्ये काट्याची आणि रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!