मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असताना नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देणारी बातमी आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीने शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेला धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराजी उफाळून आली. त्याची परिणती पुढे पक्षांतरात झाली. या घडामोडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. त्याआधीच ही धक्का देणारी घडामोड घडली आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
यावेळी सागर मुंडे यांच्या बरोबरच माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफीक काझी, मनीष पुरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, श्रीकांत जावळे, अन्वर दुर्रानी यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.