लाहोर : पबजी या खेळासाठी १४ वर्षांच्या मुलाने घरातल्या सदस्यांची हत्या केली. मुलाने गोळ्या झाडून आई, भाऊ आणि दोन बहिणींची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमधील लाहोरच्या कहाना येथे घडला.
मुलाला पबजी खेळाचे व्यसन लागले होते. घरातले सदस्य पबजी खेळणे थांबव आणि अभ्यास कर असे वारंवार समजावून सांगत होते. पण मुलगा घरातल्यांचे ऐकत नव्हता. एक दिवस पबजीवरून आई मुलाला ओरडली. या घटनेमुळे संतापलेल्या मुलाने रागाच्या भरात आईच्या कपाटात स्वसंरक्षणासाठी असलेले पिस्तुल हाती घेतले. पिस्तुलातून गोळ्या झाडून मुलाने आई नाहिद मुबारक (४५), भाऊ तैमूर (२२) तसेच १७ आणि ११ वर्षांच्या दोन बहिणी अशी चौघांची हत्या केली.स्थानिक पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलावर मानसोपचार सुरू आहेत.
याआधी रात्री आई ओरडली त्यावेळी मुलाने आईची आणि झोपलेल्या तीन भावंडांची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलगा रात्री घरातच थांबला. सकाळी त्याने घरात घुसून अज्ञातांनी चौघांची हत्या केली अशी बोंब ठोकली. मी वरच्या मजल्यावर झोपलो होतो त्यावेळी कोणीतरी घरात घुसून हत्या केल्या असे तो सांगत होता. पोलिसांना त्याचे बोलणे प्रथमदर्शनी संशयास्पद वाटले. अधिक तपासात आईने एक पिस्तुल खरेदी केले होते असे पोलिसांना कळले. बराच वेळ शोधाशोध करूनही पोलिसांना घरात पिस्तुल सापडले नाही. पिस्तुल प्रकरणी उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात होताच मुलाने घरातल्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
लाहोरमध्ये गेमच्या नादात तीन तरुणांनी आत्महत्या केली आहे. आता १४ वर्षांच्या मुलाने घरातल्या चार सदस्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. गेममुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेली नवी पिढी भरकटत असल्याचे चित्र आहे. या सर्व घटनांमुळे लाहोरमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकांनी हिंसक गेमिंगवर देशात बंदी घालावी तसेच या गेमशी संबंधित साहित्य आणि यंत्रणेची विक्री थांबवावी अशी मागणी केली आहे.