कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असताना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू व भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने आणि त्याच्या स्थानिक साथीदाराने घरासमोर अंधश्रद्धेशी संबंधित साहित्य टाकल्याचे समोर आले. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही; मात्र नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली.
फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती साहित्य टाकून निघून जाताना दिसताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेच्या माध्यमातून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ही बाब समजताच सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी बंगाली भोंदू बाबा आणि त्याच्या स्थानिक साथीदाराला शोधून काढत दोघांना मारहाण केली व शहरातून धिंड काढली. या घटनेमुळे काही काळ विटा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर दोघांनाही विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी विटा पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून व कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचा सखोल तपास सुरू आहे. निवडणूक काळात समाजात भीती, गैरसमज आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या अशा प्रकारांकडे पोलिसांनी गंभीरपणे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.