वसई : वृत्तसंस्था
सातीवली येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसर हादरला आहे. सहावीतील विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेने दिलेल्या शंभर उठाबशांच्या शिक्षेमुळे तिचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काजल उर्फ अंशिका गौड (वय 13) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी घडला असून बालदिनाच्या दिवशी, 14 नोव्हेंबर रोजी अंशिकाने अखेरचा श्वास घेतला.
सातीवली येथील श्री हनुमंत विद्या हायस्कूल येथे अंशिका इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. शुक्रवारी तिला आणि तिच्या काही सहाध्यायांना शाळेत पोहोचायला दहा मिनिटांचा उशीर झाला. यावर वर्गशिक्षिकेने सर्वांना शिक्षा म्हणून शंभर उठाबशा काढण्याचे आदेश दिले.इतर विद्यार्थ्यांनी काही उठाबशा काढून आपापल्या जागी बसून घेतले; मात्र भीतीपोटी अंशिकाने संपूर्ण १०० उठाबशा पूर्ण केल्या. त्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडू लागली. घरी गेल्यानंतर अंशिकेची प्रकृती ढासळत गेली. दुसऱ्या दिवशी गंभीर अवस्थेत तिला वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती आणखी खालावल्याने तिला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारदरम्यान 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराला मनसे कार्यकर्त्यांनी टाळे ठोकत, शिक्षिकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशारा दिला आहे. या शाळेला कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचा मुद्दाही यानिमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, शिक्षिकेची चौकशीही सुरू आहे. बालदिनासारख्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर पालक आणि नागरिकांमध्ये संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. आता शाळा प्रशासनाविरुद्ध आणि संबंधित शिक्षिकेविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.