जळगाव : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना एका माथेफिरू तरुणाने जबरदस्तीने पकडून विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार साकरी गावात समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकवर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन चौधरी असे आरोपी तरुणाचे नाव असून तो गावातीलच रहिवासी आहे. पीडित दोन्ही मुली इयत्ता नववीत शिकत असून मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी गावातून निघाल्या होत्या. गावाजवळील एका शेतालगत पोहोचताच दबा धरून बसलेल्या आरोपीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबरदस्तीने ओढत विहिरीजवळ नेऊन एकामागोमाग एक विहिरीत फेकून दिले.
या प्रकारादरम्यान मुलींनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून शेजारच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गावात ही माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. दोरखंड व शिडीच्या सहाय्याने मुलींना विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. हे वृत्त लिहीपर्यंत बचावकार्य सुरू होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, मुलींना विहिरीत फेकण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे कृत्य जुन्या वादातून, एकतर्फी प्रेमातून की अन्य कोणत्या विकृत मानसिकतेतून घडले, याचा तपास सर्व अंगांनी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या संतापजनक घटनेमुळे साकरी गावासह संपूर्ण भुसावळ तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.