ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! संपत्तीच्या हव्यासातून सासूने काढला सुनेचा काटा

कल्याण वृत्तसंस्था : कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या लालसेतून नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. वालधुनी नदी पुलाखाली सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा अवघ्या २४ तासांत झाला असून, स्वतःच्या सासूनेच आपल्या मित्राच्या मदतीने सुनेचा निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी वेगवान तपास करत सासू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.

गुरुवारी १ जानेवारी २०२६ च्या रात्री वालधुनी पुलाखाली एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला अपघाताचा संशय होता; परंतु जखमांचे स्वरूप पाहता पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला.

तपासात मृत महिलेची ओळख रुपाली विलास गांगुर्डे (३५) अशी पटली. विशेष म्हणजे रुपाली बेपत्ता असल्याची तक्रार तिची सासू लताबाई गांगुर्डे (६०) हिनेच दिली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासणीत सासूच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. सखोल चौकशीत लताबाईने आपला मित्र जगदीश म्हात्रे (६७) याच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.

पोलिस तपासात हत्येमागील कारण आर्थिक वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. रुपालीच्या पतीचे सप्टेंबर २०२५ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर रेल्वेतील नोकरी अनुकंपा तत्त्वावर रुपालीला मिळणार होती, याला सासूचा तीव्र विरोध होता. तसेच पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभावरून सासू-सुनेत सातत्याने वाद होत होते.

दोन्ही आरोपींना कोठडी
१ जानेवारीच्या रात्री सासू-सुनेतील वाद टोकाला गेला. त्यावेळी लताबाई आणि जगदीश यांनी मिळून रुपालीवर लोखंडी रॉडने हल्ला केला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घरातील रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्यात आले आणि मृतदेह रिक्षातून नेऊन वालधुनी पुलाखाली फेकून देण्यात आला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!