दुधनी येथे श्री सिद्धरामेश्वर यात्रेला महाअभिषेकाने प्रारंभ
नंदीध्वजास तैलाभिषेक; सात दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दुधनी येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेला सोमवारपासून विधीवत प्रारंभ झाला. दुधनी विरक्त मठाचे म. नि. प्र.डॉ.शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात ही यात्रा मोठ्या भक्तिभावात
पार पडत आहे.
यात्रेच्या प्रारंभी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर मल्लीकार्जुन मंदिरातील मानाच्या नंदीध्वजास नागफणी बांधून आकर्षक सजावट करण्यात आली. मानकरी ईरय्या पुराणीक, चन्नविरय्या पुराणीक, देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी तसेच सेवेकरी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून यात्रेला अधिकृत प्रारंभ करण्यात आला.
ही यात्रा सात दिवस चालणार असून प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार रोजी लिंगास तैलाभिषेक, मंगळवारी नंदीध्वज मिरवणूक,त्यानंतर अक्षता समारंभ होणार आहे. बुधवारी श्री मल्लीकार्जुन पालखी सोहळा, होम पूजा विधी व होम प्रदीपन कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवारी श्री एस. जी. परमशेट्टी प्रशालेच्या मैदानावर शोभेचे दारूकाम व रात्री भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध मल्लांच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन होणार असून, शनिवारी विविध प्रकारच्या जनावरांचे (प्रदर्शन) होणार आहे. रविवारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक बवंडवे यांच्या उपस्थितीत तसेच डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. त्यानंतर आठ दिवस चालणारा जनावरांचा बाजार भरविण्यात येणार आहे.
या यात्रेनिमित्त कर्नाटक व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात व्यापारी, शेतकरी व खरेदी-विक्री करणारे भाविक दुधनी येथे दाखल होत असतात. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान पंचकमिटीच्या वतीने जनावरांसाठी पाण्याची तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच दुधनी येथील सामाजिक संघटनांच्या सहकार्याने दररोज भात व वरणाचे वाटप करण्यात येत आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.