ध्यास विश्वसार्ह बातमीचा

म्हैसलगेत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती यात्रा महोत्सवाला प्रारंभ

२३ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

दि.२३ एप्रिलपर्यंत हे सर्व कार्यक्रम चालणार असून या दरम्यान पंच कमिटीच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष श्रीशैल भतगुणकी यांनी दिली.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या यात्रेला दरवर्षी सुरुवात होत असते.पाडव्यादिवशी पंचांग पठण व पालखी महोत्सवाला प्रारंभ झाला.पालखी महोत्सव १८ तारखेपर्यंत चालणार आहे.यानंतर दि.१६ एप्रिल रोजी पवमान होम,दि.१७ रोजी राम जन्मोत्सव दुपारी १२ वाजता,दि.१८ रोजी धनगरी ओव्याचा कार्यक्रम होईल.

याच दिवशी रक्तदान शिबिर,सर्व रोग निदान शिबिर, दंत तपासणी शिबिर होईल.या आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.दि.१९ रोजी सायंकाळी ५ वाजता दही हंडी,महाप्रसाद कार्यक्रम,दि.२० रोजी कन्नड गी गी पद कार्यक्रम,सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्त्या पार पडतील.रात्री १० वाजता ग्रामपंचायती गंगव्वा अर्थात अप्पा हिंग मगा हांग हे कन्नड नाटक सादर होणार आहे.उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक दशरथ भतगुणकी व युवा नेते रमेश देसाई यांच्या हस्ते पार पडेल.दि.२३ रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव त्यानंतर गुलाल कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे.या दिवशी मुख्य हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम होणार असल्याने म्हैसलगे व परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

यात्रा यशस्वी करण्यासाठी गुरुसिद्धप्पा जोकारे, सिद्धाराम पुजारी,भीमाशंकर बिराजदार,राहुल कुलकर्णी,उमाकांत कुलकर्णी ,गौडप्पा पाटील ,बाबूगौडा पाटील,इरणा सुतार आदि प्रयत्नशील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!