अक्कलकोट, वृत्तसंस्था
ज्यावेळी राज्याची सत्ता भाजपच्या हातात गेली. तेव्हापासून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली हे पाप भाजपचे आहे. यावेळी जनता त्यांना थारा देणार नाही, असा विश्वास माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील करजगी या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांच्या स्वागताने आणि दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मन भारावून गेले. त्यामुळे माझा विजय कोणी रोखू शकत नाही. विद्यमान महायुती सरकारने महाराष्ट्राची लूट सुरु ठेवली आहे. त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा कहर झाला आहे. महाराष्ट्राची अस्मिता त्यांनी गहाण ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, तर शेतीमालाला हमीभाव मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटलं आहे. यंदा तालुक्यात परिवर्तन घडवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एकजुटीने उभं राहून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणणे काळाची गरज आहे, असा ठाम निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांना या परिवर्तनाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पिंटू पाटील, प्रकाश पाटील, मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी, मल्लिकार्जुन काटगाव, आनंद बुक्कानूरे, बंदेनवाज कोरबू, हुसेनी अत्तार, चिदानंद परतबादी, बसवराज दसाडे, नागनाथ दसाडे, शिवानंद निंबाळ, बसवराज झुंजा, बसवराज कुंभार, आडव्यप्पा गौडगाव आदिंसह महाविकास आघाडी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.