मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ई-केवायसीची माहिती देताना सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, संबंधित पोर्टलवर एरर येत आहे. ई-केवायसी करण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागितली जाते. मात्र, येथेच एरर येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना अडचण होत आहे.