मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विरोधकांनी बदलापूर प्रकरणी केलेल्या वक्तव्यावर नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले कि, “कायद्याचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती त्वरीत झाली पाहिजे, असे ही वैयक्तिकरित्या मानतो. आम्ही चकमकींवर विश्वास ठेवत नाही;पण जर आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का,” असा सवाल करत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीने पोलिसांवर हल्ला झाला म्हणून त्यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपींवर गोळ्या झाडल्या, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अशा घटनांचा गौरव केला जाऊ नये. या प्रकणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बदलापूरच्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे, तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना एका पोलिसाचे पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. यानंतर दुसर्या दिवशी मुंबईत विविध ठिकाणी फडणवीस यांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्ज लागले. होर्डिंग्जमध्ये फडणवीस यांच्या हातात बंदूक असून, बदलापुरा (बदला पूर्ण) असा मजकूर होता. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, “अशा प्रकारचे होर्डिंग लावणे पूर्णपणे चुकीचे आहे. असे अजिबात होऊ नये. अशी घटना घडू नये, असे माझे मत आहे, चकमक प्रकरणाची सीआयडी निष्पक्ष चौकशी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमचे सरकार चकमकींवर विश्वास ठेवत नाही. कायद्याचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती त्वरीत झाली पाहिजे, असे मी वैयक्तिकरित्या मानतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.