मुंबई : वृत्तसंस्था
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांची विविध प्रकरणांत चौकशी सुरू होती. फडणवीस बेकायदा फोन टॅपिंगमध्ये दोषी आहेत. गुन्हा केला, ही भावना त्यांच्या मनात असल्यानेच अटकेची भीती होती. त्यामुळेच स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, अशी टीका करत शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक केली जाणार होती. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजप आमदार फोडण्याचाही कट आखला होता, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी ही टीका केली आहे.
राऊत पुढे म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर असताना विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून फोन टॅप केले गेले. रश्मी शुक्ला यांनी याबाबत कबुली दिली होती. मात्र त्यानंतर यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले. ते मागे का घेण्यात आले, असा सवाल करत चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य सर्वांसमोर आले असते. फोन टॅपिंगचा गुन्हा गंभीर आहे. इतर देशात अशा आरोपांसाठी तत्काळ अटक करण्यात येते. फडणवीस यांनी असा गंभीर गुन्हा केल्यानेच त्यांच्या मनात भीती होती. अटक टाळण्यासाठी शिंदेंवर दबाव आणून पक्ष फोडला, असा दावाही राऊतांनी केला आहे.