नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवी दिल्ली संसदेतील घुसखोरीमुळे सुरक्षेत चूक झाली आहेच; परंतु बेरोजगारी आणि महागाई या घुसखोरीमागील खरे कारण आहे, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. भाजपने राहुल यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना, ते नेहमीच वायफळ बडबड करत असल्याची टीका केली. तसेच बेरोजगारी दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर असल्याचा दावाही भाजपने केला.
संसदेतील घुसखोरी प्रकरणावर शनिवारी पत्रकारांनी राहुल यांना विचारले असता त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. संसदेच्या सुरक्षेत नक्कीच चूक झाली आहे आणि ते कोणीच नाकारत नाही. परंतु ही घुसखोरी का झाली, याचादेखील विचार करण्याची गरज आहे. बेरोजगारी आणि महागाई या दोन प्रमुख कारणांमुळे संसदेत घुसखोरी झाली. बेरोजगारी हा सध्या देशापुढील सर्वात मोठा मुद्दा आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे युवकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने या मुद्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करण्यात यावी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्ष करत आहेत.
विरोधकांच्या गोंधळामुळे गुरुवार आणि शुक्रवारी असे दोन्ही दिवस संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी नेहमीच वायफळ बडबड करतात, अशी प्रतिक्रिया दिली. देशातील बेरोजगारी दर ३.२ टक्क्यांवर असून तो सहा वर्षातील नीचांकी आहे, असा दावा मालवीय यांनी केला. तसेच संसदेत घुसखोरी करणाऱ्यांसोबतच्या संबंधांवर राहुल आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी खुलासा करावा, असेही ते म्हणाले.