ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरमध्ये दुचाकीस्वार, सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे

 

सोलापूर, वृत्तसंस्था 

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता रस्ते अपघात रोखण्यासाठी बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जाणार आहे. आता दुचाकीवरील पुढे बसलेल्यासह मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर देखील हेल्मेट बंधनकारक असणार आहे. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट आहे, पण मागच्या व्यक्तीकडे नसेल तरी एक हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.

लेन कटिंग, ट्रिपलसीट दुचाकी, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, मद्यपान करून वाहन चालविणे, १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच वाहन चालविणे, अशा बाबींवर कारवाईवेळी अधिक फोकस केला जाणार आहे.  जिल्ह्यात सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू होणाऱ्या ठिकाणांना (ब्लॅकस्पॉट) आरटीओ, वाहतूक पोलिस, महामार्गाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुसती पाहणी व तात्पुरत्या उपाययोजना न करता त्या अपघातप्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने ही पाहणी होणार आहे. रस्त्यालगत विशेषत: महामार्गालगत उभारलेली खोकी तथा हातगाड्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणाजवळील हॉटेल, पेट्रोलपंपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी अपघात झालेल्यासंदर्भात पोलिसात दाखल फिर्यादींची पडताळणी करून अपघातात नेमकी चूक कोणाची, हे शोधले जाणार आहे. एकूणच अपघात रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खंबीर पाऊल उचलले आहे.

पहिल्यांदा रस्त्यावर तथा महामार्गांवर वाहन चालविणाऱ्याने वाहतूक नियम मोडला आणि त्याला दंड झाल्यास सुरवातीला दंड भरण्याची घाई केली जाणार नाही. दुसऱ्यांनाही अशीच स्थिती राहील, पण तिसऱ्यांदा वाहतूक नियम मोडल्यास यापूर्वीचा सगळा दंड त्या वाहनचालकाला जागेवरच भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास त्याचे वाहन जप्त करण्याची करवाई केली जाणार आहे. नियम मोडून एखादे वाहन पुढे निघून गेल्यास त्याची माहिती जवळील टोल नाक्यांवरील महामार्ग पोलिसांना देवून त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होईल, असेही वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!