द्वेष आणि सुडाच्या राजकारणामुळे निवडणुकीच्या मैदानात : काडादी
धर्मराज काडादी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर, वृत्तसंस्था
सत्तेचा गैरवापर, द्वेष आणि सुडाच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासोबत तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची आपल्याला साथ आहे. दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेची ही लढाई आहे. ही लढाई तडीस नेण्यासाठी दक्षिण सोलापूरच्या मतदारांनी ‘कॉम्प्युटर’समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सिध्देश्वर परिवाराचे अध्वर्यू तथा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले.
बुधवारी, जुळे सोलापूर परिसरातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे काडादी यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हजारोंच्या साक्षीने विविध मठांचे महास्वामीजी आणि नेतेमंडळींच्या उपस्थितीत झाले. यावेळी माळकवठाचे श्री.ष.ब्र. पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे नीळकंठ शिवाचार्य महास्वामी, अक्कलकोटचे निरंजनमूर्ती बसवलिंग महास्वामी, मंद्रूपचे निरंजन देवरू महास्वामी, श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष हरीश पाटील, शेतकरी संघटनेचे नेते अख्तरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, माजी उपसभापती अॅड. संजय गायकवाड, दक्षिण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अरूणा बेंजरपे, कोळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, बसवराजशास्त्री हिरेमठ, शिवयोगी स्वामी होळीमठ, बाळू मामा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील, शेतकरी नेते सिकंदरताज पाटील, भारत जाधव, सुभाष पाटील वडापूर यांच्यासह इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दक्षिण सोलापूरसह जिल्ह्यात सुरू असलेले द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे. कुरघोडीच्या वृत्तीमुळे तालुक्याचा खुंटलेला विकास मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणे आवश्यक असल्याचे काडादी यांनी सांगितले. आपल्या अपक्ष उमेदवारीबद्दल काडादी यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली. सोलापूरला भेडसावणार्या नागरी समस्यांचा पाढा त्यांनी वाचला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छता आदी आघाड्यांवर सत्ताधारी आमदार अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे ग्रामीण भाग अद्यापही कॅनलद्वारे उजनीच्या पाण्यासाठी तहानलेला असल्याचे काडादी यांनी सांगितले.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी स्थापन केलेल्या संस्थांचे काम मोठे आहे. हे काम पुढे नेत असताना आपण त्या संस्था केवळ टिकवल्या नाहीत तर अत्यंत कार्यक्षमतेने त्यांचा विस्तार केला आहे. गेल्या अर्धशतकांहून अधिक काळापासून श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा जपली असल्याकडे काडादी यांनी लक्ष वेधले.
दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वसमावेशक नेतृत्वाचा मोठा वारसा आहे. शेवटच्या माणसाच्या मदतीला येण्यासाठी सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे, लोकनेते बाबूरावअण्णा चाकोते, दी. शि. कमळे गुरुजी, ब्रह्मदेवदादा माने, आनंदराव देवकते, गुरूनाथ पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा वारसा आपण जपला आहे. सुडाचे, द्वेष भावनेचे राजकारण या आमच्या पूर्वजांनी कधीच केले नाही. संस्थात्मक काम करताना त्यांच्याप्रमाणेच सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजघटकांच्या सहभागातून तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही काडादी यांनी दिली.
याप्रसंगी सिध्देश्वर परिवारातील सदस्य, सिध्देश्वर कारखान्याने सभासद आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज काडादी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
माजी आमदार दिलीप माने यांचा पाठिंबा
ज्येष्ठ नेतेमंडळींनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. ज्येष्ठ नेत्यांच्या आणि तालुक्यातील प्रमुख नेते आणि जनतेच्या आग्रहामुळे आपण महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आघाडीतील घटकपक्षाच्या घाईमुळे काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अखेरच्या क्षणी ‘गंगा निवास’मध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसकडून इच्छुक असलेले माजी आमदार दिलीपराव माने यांनी स्वत: माघार घेऊन आपल्याला पाठिंबा देत निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याचे काडादी यांनी सांगितले. दिलीपराव माने यांच्यासह त्यांची सर्व यंत्रणा आपल्यासोबत असल्याचे काडादी यांनी सांगितले.
चांगल्याची सोलापूरकरांना पारख
वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगले म्हणण्याची पारख सोलापूरकरांना आहे. ही लढाई पक्ष अथवा व्यक्तीच्या विरोधातील नसून विचारांची आहे. पैशांची असो वा इतर कोणत्याही ताकदीपेक्षा जनतेची ताकद मोठी आहे. जनतेने मतदानाच्या रूपाने आपल्या पाठीशी ताकद उभी करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काडादी यांनी केले.
‘कॉम्प्युटर’ हे निवडणूक चिन्ह
अपक्ष उमेदवार म्हणून धर्मराज काडादी यांना ‘कॉम्प्युटर’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात कॉम्प्युटर हे प्रगती आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. तरुणांमध्ये पारंपरिक शिक्षणापेक्षा कॉम्प्युटर शिक्षणाकडे अधिक कल आहे. विकासासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला कॉम्प्युटर हे चिन्ह मिळावे, हा शिवयोगी सिध्दरामेश्वरांचाच आशीर्वाद असल्याची आपली भावना असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांंगितले.