सोलापूर, वृत्तसंस्था
ऐन निवडणुकीच्या दिवशीच सोलापूर दक्षिण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका बसला आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. काडादी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे, यामुळे आता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शिंदे यांनी सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून मी या मतदान केंद्रावर मतदान करतो. आता या मतदारसंघात धर्मराज काडादी उमेदवार आहेत.या मतदारसंघात चांगले वातावरण आहे. काडादी एक चांगले उमेदवार आहेत, त्यांना भविष्य आहे. या मतदारसंघात माने यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना फॉर्म मिळालेला नाही त्यामुळे माने यांनीही काडादी यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली. आम्ही या ठिकाणावरुन दोनवेळा निवडून आलो होतो. आम्ही आता त्यांना हे सगळं समजून सांगितले आहे. यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांनी असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज लोकशाहीचा सण आहे, तो साजरा केला पाहिजे. देशात लोकशाही टीकेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे, पण जोपर्यंत देशात काँग्रेस आहे तोपर्यंत टीकणार. मागील निवडणुकीत तुम्ही विजय लोकशाहीचा झाला हे बघितले आहे. आता त्यांचे दिग्गज नेते पैसे वाटप करत असल्याचे दिसले आहे. त्यांना त्यांची हार दिसत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचा विजय झाला आहे हे निश्चित आहे.
“सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिले आहेत. आम्ही आधी उमेदवार दिला होता, पण शेवटच्या क्षणी त्यांना ओबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांनी अर्ज मागे घेतला. पण काही कारणामुळे इकडे फ्रेंडली फाईट झाली नाही, संजय राऊत यांनी मायनर दुरुस्ती करणार असं सांगितलं होतं, पण झाले नाहीत. म्हणून आता आम्ही धर्मराज काडादी यांच्यासोबत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.