सोलापूर, वृत्तसंस्था
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून लग्नाची केलेली मागणी धुडकावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मंद्रप पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार त्याच गावात राहणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला आहे.
संबंधीत तरुण एकतर्फी प्रेमातून तरुणीस सतत त्रास देत होता. ही तरुणी प्रतिसाद देत नसल्याने तो तिच्यावर चिडून होता. यातूनच आज तो हातात कोयता घेऊन आला. त्याने मुलीस, तुझ्यावर माझे प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न का करीत नाहीस म्हणून भांडण करू लागला. त्यास समजून सांगत लग्नास नकार दिला असता तो शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. कोयताही उगारला. तेव्हा जीवाच्या भीतीने ही तरुणी घरात पळून आली. या वेळी हल्लेखोर कोयता घेऊन पाठलाग करीत घरात शिरला. त्यावेळी आईने हस्तक्षेप केला असता त्याने आईवर आणि त्यापाठोपाठ तिच्या मुलीवरही कोयत्याने हल्ला केला. यात मायलेकी गंभीर जखमी झाल्या. त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.