सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील काही ठिकाणी फटाका कारखान्यात स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच बार्शी तालुक्यातील घारी या गावात युन्नूस मुलाणी यांच्या फटाका कारखान्याला लागलेल्या आगीनंतर येथे मोठे स्फोट झाले आहेत. वास्तविक या कारखान्यात दररोज 15 महिला मजूर काम करतात. मात्र, आज वटपौर्णिमा असल्यामुळे सर्व महिला सुट्टीवर होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, हा स्फोट एवढा भीषण होता की, बार्शी तालुक्यातील मोठ्या परिसराला या स्फोटाचे हादरे जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातीत असलेल्या या फटाका कारखान्यात अनेक भीषण स्फोट झाले आहेत. एकामागे एक झालेल्या या स्फोटांमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बार्शी तालुक्यातील घारी या गावात असलेल्या या कारखान्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीचा हा फटाका कारखाना असल्याची माहिती समोर आली आहे.
फटका कारखान्याला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. त्यानंतर कारखान्यातून स्फोटांचे मोठमोठे आवाज परिसरात ऐकू येऊ लागले. धुरांचे लोट परिसरात लांबच्या लांब दिसत होते. या फटाका कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. परंतु शुक्रवारी वटपौर्णिमा होती. त्यामुळे पुजेसाठी या महिलांनी सुट्टी घेतली होती. एकही महिला कामाला आली नव्हती. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या कारखान्यात नक्की आग कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.