ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर : चारचाकीचा भीषण अपघात : पाच जण जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. सर्व मृत हे तेलंगण राज्यातील आहेत. या घटनेची भिगवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रफिक कुरेशी (३४), इरफान पटेल (२४), मेहबूब कुरेशी (२४), फिरोज कुरेशी (२८), फिरोज कुरेशी (२७, सर्व रा. नारायणखेड, जि. मेडक, तेलंगण) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (२३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगण राज्यातील हे सहा तरुण मुंबईला फिरायला गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर आपल्या नारायणखेड या गावी पुणे-सोलापूर या महामार्गावरून परतत असताना हा अपघात झाला. दुपारी चालू झालेल्या जोरदार पावसामुळे डाळज नं. ३च्या हद्दीत रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने भरधाव असणारी कार खड्ड्यात जोरात आदळली. कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने तीन-चार पलट्या खाल्ल्या व सर्व्हिस रोडवर असलेल्या ड्रेनेज लाइनच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली. यामध्ये कारमधील पाच जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला स्थानिकांनी तत्काळ भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या कारचा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत शिंदे, दत्तात्रय मदने, भानुदास जगदाळे, नितीन जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!