ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर महापालिका : भाजपच्या उमेदवारी यादीत ‘कोठे प्रभाव’ ठळक; सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवारांवर शिक्कामोर्तब

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या १०२ अधिकृत उमेदवारांच्या यादीत आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. विशेषतः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील ४४ पैकी १४ जागांवर कोठे गटातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली आहे. तर सोलापूर दक्षिण मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने यांना ४ जागांवर उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोठे यांच्या प्रभावक्षेत्रात सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवारांकडे त्यांची थेट शिफारस किंवा राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे शहरातील निवडणूक रचना आणि स्थानिक गटबाजीच्या समीकरणांमध्ये या यादीमुळे मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

यापूर्वी उमेदवारी यादी जाहीर करण्यात झालेला विलंब हा “राजकीय संतुलन साधण्यासाठी आखलेला रणनीतीचा भाग” असल्याच्या टिप्पणीही केली जात आहे. दरम्यान, काही नेत्यांच्या शिफारशी कमी प्रमाणात मान्य झाल्याने आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे तुलनेने कमी प्रतिनिधित्व झाल्याचीही नोंद राजकीय वर्तुळात घेतली जात आहे.

यावरून, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रभावाची स्पष्ट जाणीव उमेदवारी यादीतून दिसत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आता या उमेदवारी यादीचा निवडणूक निकालांवर नेमका कसा परिणाम होतो, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळासह मतदारांचेही लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!