---Advertisement---

अक्कलकोट नगरपरिषद : स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीकडे शहराचे लक्ष

By team
On: January 1, 2026 2:12 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीनंतर आता स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे. या दोन्ही पदांसाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

नव्या सभागृहात संख्याबळानुसार यावेळी तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. मागील सभागृहात दोनच स्वीकृत सदस्य होते; मात्र यंदा ही संख्या वाढल्याने इच्छुकांची स्पर्धा वाढली आहे. भाजपचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचे नाव गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांत स्वीकृत नगरसेवकांची निवड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवड कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड झाल्यामुळे या प्रक्रियेबाबत वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या असून त्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. सध्याच्या सभागृहात भाजपचे २२ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचा एक आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे तिन्ही स्वीकृत नगरसेवक भाजपचेच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपमध्ये माजी शहराध्यक्ष शिवशरण जोजन, प्रवीण शहा, लखन झंपले, सिद्धाराम टाके, अशोक जाधव, उत्तम गायकवाड आणि रशीद खिस्तके यांची नावे चर्चेत आहेत. उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठीही रस्सीखेच सुरू आहे. ज्येष्ठत्वाचा विचार करता महेश इंगळे, महेश हिंडोळे आणि यशवंत धोंगडे ही नावे आघाडीवर आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास मुस्लिम किंवा दलित समाजातील नगरसेवकाला संधी मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय आमदार सचिन कल्याणशेट्टी घेणार असल्याचे सांगितले जात असून, कोणाला संधी मिळते याकडे शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या निवडीमुळे अक्कलकोटच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!