सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महसूल प्रशासन यांनी कॉपीमुक्त परीक्षेची घोषणा केली. मात्र बारावी परीक्षेदरम्यान या घोषणेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर चार, तर माळशिरस तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर तीन असे एकूण सात कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील ५०१ क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर एक, तर ५१९ या परीक्षा केंद्रावर तीन असे एकूण चार कॉपीचे प्रकार आढळून आले. माळशिरस तालुक्यातील ४५२ क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर एक, तर ४४१ क्रमांकाच्या परीक्षा केंद्रावर दोन असे तीन कॉपीचे प्रकार आढळून आले. अक्कलकोट तालुक्यातील कारवाई पुणे विभागीय बोर्डाच्या भरारी पथकाने तर माळशिरस तालुक्यातील कारवाई जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने केली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आढळेल तेथे कार्यरत असणारे बैठे पथक, केंद्रप्रमुख व संबंधित संस्थेवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी सात कॉपीचे प्रकार आढळल्याने त्या चार परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार ? याकडे संपूर्ण शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.