सोलापूर वृत्तसंस्था
शंभर-दोनशे रुपयांच्या स्टॅम्पवर निर्बंध घातल्यानंतर प्रत्येक खासगी दस्ताऐवजासाठी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पला मागणी वाढली असून काही जिल्ह्यांमध्ये त्याची कमतरता आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात स्टॅम्प उपलब्ध असल्याचे मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सध्या शंभर रुपयांचे 85 हजार 350 आणि पाचशे रुपयांचे 30 हजार 601 स्टॅम्प असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. 100,200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र, यापुढे आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे.
वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता 100,200 रुपयांऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प) वापरण्यात येणार आहेत. त्यामुळेच सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये 500 रुपयांचे स्टॅम्प कमी पडत असल्याची स्थिती आहे. पण, सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाल्याने त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
स्टॅम्प पुरेशा प्रमाणात उपलब्ध
आमच्या विभागाकडील 100 टक्के महसुलापैकी केवळ तीन टक्के महसूल स्टॅम्पमधून मिळतो. त्यामुळे स्टॅम्पची कमतरता शक्यतो भासत नाही, तरीपण डिसेंबरमध्ये 500 रुपयांचे स्टॅम्प मिळावेत, अशी मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात शंभर, पाचशे रुपयांचे स्टॅम्प पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.
– प्रकाश खोमणे, मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी, सोलापूर