सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यात तपमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे सोलापूरकर पुरते हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंशावर चढला होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तपमानाची नोंद सोलापूरात मंगळवारी झाली आहे. उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.
एकीकडे दुष्काळ, पाणी टंचाई हा विषय ऐरणीवर असतानाच दुसरीकडे सुर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. सकाळी ९ वाजले नंतर उन्हाचे चटके सुरु होतात तर दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. घामाच्या धारांनी सोलापूरकर हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी तपमानाने यंदाच्या उन्हाळ्यातील उष्णतेचा उच्चांक गाठला होता.
दिवसेंदिवस तापमान वाढतच जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करुन त्या ठिकाणी उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी दिल्या आहेत.