अक्कलकोटमधील सोलरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता एकरी ४० हजार रुपये
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची यशस्वी मध्यस्थी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रिन्यू ग्रीन एनर्जी सोलर कंपनी बरोबरचा वाद अखेर मिटला आहे.याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी बोलवलेल्या बैठकीतच शेतकऱ्यांना आणखी दहा हजार रुपये वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे.
गुरुवारी,या संदर्भात प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांच्या दालनामध्ये आमदार कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत सोलर कंपनीचे प्रोजेक्ट हेड परितोष श्रीवास्तव,नंदकिशोर लहाने, शंकर चव्हाण आदी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीमध्ये साधारण दोन तास चर्चा चालली. यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या चर्चेमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत वाढीव दराचा मुद्दा उपस्थित केला.प्रारंभी शेतकऱ्यांनी इतर कंपन्याप्रमाणे एकरी ५० हजार रुपये दर देण्याची मागणी केली.हा दर मात्र कंपनीने नाकारला.त्यानंतर मात्र आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांनाही समजावून सांगत एकरी ४० हजार रुपये दर देण्यावर शिक्कामोर्तब झाले.२८ वर्षे ११ महिने असा शेतकऱ्यांबरोबर करार असून पूर्वी ज्या शेतकऱ्यांबरोबर जुन्यादराप्रमाणे करार झाला. तो देखील बदलून घेण्याचा निर्णय झाला असून हा नवीन करार येत्या ४० ते ४५ दिवसात कंपनी शेतकऱ्यांबरोबर करणार आहे.या सोलर कंपनीच्या अखत्यारीत बॅगेहळळी, हसापूर, कोन्हाळी, दहिटणेवाडी, दहिटणे या पाच गावातील साधारण अडीचशेच्यावर शेतकरी आहेत.अनेक शेतकरी हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते.
बैठकीनंतर दहा हजार रुपये वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या बैठकीला मनोज शिंदे,बाबा सुरवसे ,तानाजी मोरे ,माणिक माशाळे, गजानन बिराजदार, जितेंद्रकुमार जाजू, भैरवनाथ मोरे, विठ्ठल माशाळे, अमित गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतकरी बैठकीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे उपस्थित होते. साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास यावर चर्चा होऊन तोडगा निघाला.यात प्रांताधिकारी उदमले यांनीही महत्त्वाची भूमिका घेत शेतकऱ्यांना सहकार्य केले.
तसेच या पुढच्या काळात वाढीव दरासंदर्भात शेतकरी अथवा विविध राजकीय पक्ष,संघटना यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन करून कंपनीला त्रास न देण्याचा निर्णय झाला आणि झालाच तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजचा झालेला निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असून त्यामुळे कोणत्याही एका शेतकऱ्यांनी पुन्हा या संदर्भात विषय उपस्थित करू नये, अशी सूचना आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी मांडली.याला सर्वांनी सहमती दर्शविली.
कंपनीचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य
ज्या ज्या वेळी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी माझ्याकडे आले. त्या त्या वेळी त्यांची मागणी आम्ही कंपनीकडे लावून धरली.अखेर आज कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांबरोबर आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर बैठक होऊन हा विषय संपला आहे. शेतकऱ्यांनी कंपनीचा निर्णय मान्य केलेला आहे.त्यामुळे हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
– सचिन कल्याणशेट्टी,आमदार