नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जनता महागाई, बेरोजगारी व आर्थिक मंदीमुळे त्रस्त आहे. मात्र, सरकारकडून लोकांची दिशाभूल करणे सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले. महागाई व बेरोजगारीचा ‘चेटकीण’ असा उल्लेख करत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्विटद्वारे सरकारवर टीकेची झोड उठवली.
अहंकाराचार्यांच्या महागाईच्या काळात प्रत्येक तीनपैकी एका भारतीय व्यक्तीला यावर्षी नोकरी जाण्याची भीती वाटत असून, तो ५७ टक्के महागाईने चिंतेत असल्याचे स्पष्ट करत जयराम रमेश यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदींना लक्ष्य केले. एका वृत्ताचा हवाला देत गत एक वर्षात पालेभाज्यांच्या किमती १५ ते ६० टक्के वाढल्याचा दावा त्यांनी केला. भारतातील प्रत्येक दुसरी व्यक्ती अन्यायाच्या काळात पीडित असून तो महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगारी व भांडणामुळे चिंतेत आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आपल्या नेहमीच्या शैलीत देशाची दिशाभूल करत आहे. त्यामुळे देशातील जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस आपला संघर्ष सुरू ठेवणार आहे. या संघर्षाचा भाग म्हणून रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या जलपायगुडी येथून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू होणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यात सरकारला अपयश आल्यामुळे महागाई व बेरोजगारी वाढल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.