ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी नगराध्यक्षपदाचा पदभार आज प्रथमेश म्हेत्रे दुपारी दोन वाजता स्वीकारणार सूत्रे

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दुधनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम मंगळवार, १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पार पडणार आहे. नगराध्यक्षपदाचा पदभार शिंदे सेनेचे प्रथमेश म्हेत्रे स्वीकारणार असून, उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतचा अंतिम निर्णय शिंदे सेनेचे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हेच घेणार असल्याची माहिती पक्षाचे नेते शंकर म्हेत्रे यांनी दिली. बंद लिफाफ्यातील या निर्णयाची ‘लॉटरी’ कुणाच्या नशिबी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेत गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता अबाधित होती. मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जून महिन्यात शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत शिंदे सेनेने अभूतपूर्व यश मिळविले. नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकपदे शिंदे सेनेने जिंकत नगर परिषदेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

दुधनी नगर परिषदेत शिंदे सेनेची सत्ता असताना स्वीकृत नगरसेवकपदासाठी डॉ. उदयकुमार म्हेत्रे, बसवराज रायप्पा हौदे, राजशेखर सैदप्पा परमशेट्टी आणि सचिन सिद्धाराम झळकी यांची नावे चर्चेत आहेत. तर उपनगराध्यक्षपदासाठी सिद्धाराम येगदी, सातलिंगप्पा शरणप्पा परमशेट्टी, जिलानी चांद नाकेदार आणि महंतेश मुर्गेप्पा पाटील यांची नावे पुढे येत असून, अंतिम संधी कुणाला मिळणार याचा फैसला आज होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!