वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव आरोग्य उपकेंद्र या नव्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करा – प्रा.प्रकाश सुरवसे.
अक्कलकोट – संपूर्ण राज्यात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना “बेड शिल्लक नाहीत” हे वाक्य प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सर्वत्र ऐकायला मिळत असताना शासकीय निधीतून बांधलेल्या सुसज्ज इमारती धुळ खात पडत असतील तर हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे असून अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव येथील आरोग्य उपकेंद्र या सुसज्ज इमारतीमध्ये तात्काळ कोविडशी संबंधित उपचार सुरु करावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी बोरगाव ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
संपूर्ण राज्यात व देशात कोरोना प्रादुर्भावामुळे संवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्कलकोट तालुक्यात देखील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक तपासणीकरिता अक्कलकोट सोलापूर येथे जात आहेत. तसेच सोलापूर सारख्या ठिकाणी वातावरण गंभीर बनल्यामुळे कांही नागरिक त्रास सहन करत घरीच राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. यावर रामबाण उपाय म्हणून वागदरी येथे पाच कोटी रुपये खर्चाचे प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव येथील पासष्ट लाख रुपये खर्चाचे आरोग्य उपकेंद्र या सुसज्ज इमारती बांधून तयार आहेत. त्यांचा वापर प्री-कोविड सेंटर आणि कोविड केअर सेंटर म्हणून सुरु करावा.
याकरिता आवश्यक बेड, आवश्यक उपकरणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन युनिट , डॉक्टर्स, नर्स, व अन्य स्टाफ ची तात्काळ तरतूद करून या परिसरातील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास संभाव्य धोके टाळता येणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी कृत्रिम कोविड सेंटर उभारले जात असताना अक्कलकोट सारख्या तालुक्यात शासनाच्या निधीतून बांधलेल्या सुसज्ज इमारती मात्र ओस पडलेल्या आहेत हे चित्र दुर्दैवी आहे.
याविषयी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.आरोग्यमंत्री, मा.पालकमंत्री तसेच सोलापूर चे जिल्हाधिकारी, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी, अक्कलकोट तहसीलदार, अक्कलकोट पं. स. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे व शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे मागणी करणार असून वागदरी व परिसरातील बोरगाव दे. बादोले बु., घोळसगाव, किरनळ्ळी, गोगाव, खैराट, भूरिकवठे, पालापूर, बादोले खु. साफळे याबरोबरच तालुक्यातील अन्य गावातील नागरिकांना या कठीण प्रसंगी संजीवनी मिळणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने, सुधाकर पाटील, बोरगाव उपसरपंच राजेभाई मुजावर, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामडगी, पालापूर चे माजी सरपंच बाबन जमादार, बादोले उपसरपंच सिध्दाराम बिराजदार, श्रीकृष्ण मगर, महेश हत्तरके, मराठा सेवा संघ अध्यक्ष प्रवीण घाटगे, पवन पाटील, परमेश्वर स्वामी, मोहन पाटील, जकीउल्ला हिप्परगे, विकास सुरवसे, प्रा. मनोज जगताप, महिबूब तासेवाले, भागेश जिरगे, अमीन फुलारी, सत्तार शेख, अब्दुल शेख, वसीम मुल्ला उपस्थित होते.
★ उदघाटन नंतर करू. आधी माणसं वाचवू.
राज्यात आणि देशात “कुणी बेड देता का बेड” अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली असताना अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, बोरगाव दे. समर्थनगर या गावांमध्ये आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या नव्या सुसज्ज इमारती बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या कठीण काळात उद्घाटनाची औपचारिकता बाजूला ठेऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून येथील नागरिकांच्या सोयीकरिता या इमारती खुल्या कराव्यात. व याठिकाणी कोविडशी संबंधित lसर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा व चोवीस तास डॉक्टर्स स्टाफ उपलब्ध करून द्यावे. उदघाटन नंतर करू सध्या माणसं वाचवण हेच प्रमुख उद्दिष्ट असलं पाहिजे – प्रा. प्रकाश सुरवसे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर.