मुंबई : वृत्तसंस्था
देशातील ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून त्यात ३ राज्यात भाजपने बाजी मारली आहे. यावर आता सर्वच विरोधक भाजपवर टीका देखील करीत असतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
भाजपने 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असला तरी याविषयी लोकांच्या मनात काही शंका आहेत. त्यामुळे भाजपने किमान एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी भाजपला मुंबईसह राज्यातील 14 महापालिकांची निवडणूक घेऊन दाखवण्याचे आव्हानही दिले आहे.
भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवला. संजय राऊत यांनी या प्रकरणी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत या विजयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. आम्ही जनादेश मान्य करतो. पण लोकांच्या मनात शंका आहे. विशेषतः मध्य प्रदेश व छत्तीसगडमदील निकालानंतर लोकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे भाजपने किमान एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी, असे राऊत यांनी म्हटले आहे.