ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विद्यार्थ्यांची नौका उलटली : १६ जणांना जलसमाधी

वडोदरा : वृत्तसंस्था

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक नौका उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली आहे. मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. त्यामुळे सरोवरात पर्यटन भ्रमंती करणे त्यांच्या जीवावर बेतले. या दुर्घटनेतून ९ बालके व २ शिक्षकांचे प्राण वाचवण्यात मोठे यश आले आहे. या सर्वांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळालेल्या महितीनुसार, वडोदऱ्यातील न्यू सनराइज शाळेतील २३ विद्यार्थी सुट्ट्या असल्यामुळे हरणी सरोवरात पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या सोबत सुमारे चार शिक्षक होते. यापैकी कोणीही जीवरक्षक जॅकेट परिधान केले नव्हते. याचदरम्यान अचानक नौका 1 उलटली. त्यामुळे सर्वजण पाण्यात बुडू लागले. काही मिनिटांतच दुर्दैवाने १४ बालके व २ शिक्षकांना जलसमाधी मिळाली, अशी माहिती गुजरातचे शिक्षणमंत्री कुबेर डिंडोर यांनी दिली आहे. नौका उलटल्यानंतर ती बुडाल्याचे वृत्त कळताच तातडीने बचाव अभियान राबवण्यात आले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) व अग्निशमन दल आणि इतर संस्था बचाव कार्यात जुंपल्या. या वेळी ९ विद्यार्थी व २ शिक्षकांचे प्राण वाचवण्यात मोठे यश आले. बचाव अभियानात अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर, बचावलेल्यांना वडोदरा शहरातील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या हे सर्व जण सुरक्षित आहेत, असे जिल्हाधिकारी ए. बी. गोर यांनी सांगितले. याचदरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी सरोवरात उड्या घेत अनेकांचा जीव वाचवला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!