सोलापूर (प्रतिनिधी) पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे रक्षक व्हायचे असते मात्र ते आता भक्षक होताना दिसत आहेत. पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याचे पाप करू नये अन्यथा नागरिक, शेतकरी, भाजप आणि पक्षाचे सहयोगी आमदारांना घेऊ तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
गेल्या वर्षीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी पळवण्याचा डाव केला होता. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी, शेतकर्यांनी तो डाव हाणून पाडला होता. मात्र आता पुन्हा तेच पाप पालकमंत्र्यांकडून होत आहे. लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपये राज्य सरकारने देणे हा कुटील डाव आहे. नाव बदलून आणलेली योजना जुनी आहे. यामुळे उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला नव्याने नेण्यात येत आहे. पालकमंत्री जरी इंदापूरचे आमदार असले तरी ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे रक्षक व्हायचे असते मात्र ते आता भक्षक होत आहेत. हे आम्ही खपवून घेतले जाणार नाही. आपले याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले आहे. ते 20 रोजी सोलापूर दौर्यावर येत आहे. त्यामुळे भाजपचे आणि सहयोगी पक्षाचे सर्व आमदार त्यांना भेटून याबाबत भूमिका मांडणार आहेत. पालकमंत्र्यांनी पाणी पळवण्याचा डाव न थांबवल्यास शेतकरी, नागरिकांना घेऊन आमचे सर्व आमदार तीव्र आंदोलन करतील, असा इशारा आ. देशमुख यांनी दिला आहे. याबाबत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आणि इतर माजी आमदारांनीही आवाज उठवावा, असेही आवाहनही आ. देशमुख यांनी केले.