ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीसह मनसेच्या प्रयत्नाला यश : निवडणूक आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी सलग दोन दिवस निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीत घोळ तपासण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल मानले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मतदार यादीतील अनेक त्रुटी आणि घोळ समोर आले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याचा उल्लेख करत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचे ठळकपणे दाखवले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते आयोगाशी भेट घेऊन पुरावे सादर करत होते. या पुराव्यांमध्ये एकाच घरात शेकडो नावे नोंदलेली असल्याचा उल्लेख होता.

नागपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 200 मतदार असल्याचे गंभीर आरोप विरोधकांनी केले होते. यासह, जयश्री मेहता या महिलेसाठी दहिसर, चारकोपसह एकूण चार ठिकाणी मतदान नोंदले गेले होते, तर मोहन नंदा बिलवा या महिलेसाठी मतदार यादीत तीन ठिकाणी नाव असल्याचा दावा करण्यात आला होता. या सर्व पुराव्यांनंतर आयोगाचे अधिकारी काही काळ निरुत्तर झाले, पण अखेर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, एकाच मतदारसंघात एकाच महिलेसाठी अनेक नावे असल्यास चौकशी करून दोषी अधिकारी असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि दिवाळीनंतर हा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. अहवाल आल्यानंतर विरोधकांना त्याची प्रत उपलब्ध करून दिली जाईल.

राज ठाकरेंकडून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, मतदार यादीत त्रुटी सुधारल्या शिवाय निवडणुका घेऊ नयेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही अनेक मतदारांची नावे असून त्याचबरोबर फोटो नसणे, मुलांच्या वयापेक्षा वडिलांचे वय कमी असणे, या प्रकारच्या त्रुटी लक्षात आल्या आहेत. यासह, खोट्या यादीतील नावे माध्यमांवर आल्यावर गायब होणे, नवीन नावे टाकली जाणे याची माहिती निवडणूक आयोगाला न मिळणे, हे देखील विरोधकांकडून गंभीर आरोप म्हणून मांडले गेले आहेत. महाविकास आघाडीच्या शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी निवडणूक आयोगाशी भेट घेतली आणि यादीतील त्रुटी स्पष्ट करून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. राज ठाकरे यांनीही या संदर्भात विशेष भूमिका बजावली आणि निवडणूक आयोगाने स्थानिक तसेच केंद्रीय यंत्रणांसह एकत्रित तपासणी करावी, अशी मागणी केली.

मतदार यादीतील घोळ आणि त्रुटी केवळ स्थानिक स्वराज्य निवडणुकांपुरती मर्यादित नाहीत; राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून करण्यात आलेल्या मागण्या समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, मतदार यादीतील माहिती गोपनीय असूनही, यादीतील त्रुटी आणि फोटो नसणे, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास आयोगाकडे अधिकार असले तरी विरोधकांना का नाही, हा मुद्दा स्पष्ट केला पाहिजे, असे मुद्दे मांडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!