ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साखरेचे भाव वाढल्यास ऊसाचे दर यापेक्षाही जास्त-चेअरमन गणेश माने देशमुख

चपळगांव गटातील शेतकऱ्यांना चेअरमन गणेश माने देशमुख यांनी स्वतः दिला चेक

चपळगांव : प्रतिनिधी

शेजारच्या बांग्लादेश,श्रीलंका व नेपाळ देशात साखरेचे भाव १०० रुपयांपेक्षा जास्त प्रतिकिलो भाव आहे.ही वस्तुस्थिती आहे.पण आपल्या भारतात साखरेचे भाव फक्त ५० रुपये प्रतिकिलो मिळाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ऊसाला ४००० रुपये दर देण्यात आम्हा कारखानदारांना काहीच अडचण नाही.यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाचे दर नव्हे तर साखरेचे दर वाढवुन मिळण्यासाठी आंदोलने करण्याची गरज असल्याचे मत जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी व्यक्त केले.

आचेगाव ता.दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगरकडुन १४ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत चपळगाव गटातुन आलेल्या ऊसाला प्रतिटन २७०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना चेअरमन गणेश माने देशमुख यांच्या हस्ते थेट गावात जाऊन चेकचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अर्जुन आगावणे होते.तर व्यासपीठावर जेष्ठ नेते अंबणप्पा भंगे,कुमारप्पा पाटील,रमेश ग्रामकर,महादेव वाले, कार्यकारी अधिकारी आर.पी.देशमुख,शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे,बसवराज सराटे,सोमनाथ रामपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चपळगांव व कुरनुर येथील कार्यक्रमात जवळपास तीन कोटींची बिले धनादेशाद्वारे अदा करण्यात आली. पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की,ऊसबिले अदा करण्यात विलंब झाल्याने कारखाना प्रशासनाकडुन दिलगिरी व्यक्त करतो.तरीही शेतकऱ्यांनी संयम बाळगुन कारखाना प्रशासनाला सहकार्य केले आहे.ही बाब लाखमोलाची आहे.उर्वरित बिले लवकरच अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी व कारखानदारांनी एकत्रित येऊन उजनीचे पाणी व शाश्वत जलसिंचनासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सलीम पटेल यांनी तर आभार शंभुलिंग अकतनाळ यांनी मानले.

आर्थिक अडचणींमुळे चार कारखाने विकले-चेअरमन गणेश माने देशमुख..

दरम्यान चपळगाव येथील कार्यक्रमात चेअरमन गणेश माने देशमुख यांनी साखर कारखानदारीसमोर ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कारखानदार व शेतकरी हे सध्या एकाच नावेत बसलेले व्यक्ती आहेत.साखरेचा दर वाढुन मिळवण्यासाठी दोघांनीही सामुहिक संघर्ष करण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांत याच कारणामुळे चार कारखानदारांनी आपले कारखानेच विकुन काढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!