मुंबई : वृत्तसंस्था
महाविकास आघाडीत (मविआ) सामावून घेण्याच्या मुद्द्यांवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली. आता मात्र त्यांचे काँग्रेससोबत सूत जुळले असून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी वंचितने दर्शवली आहे. याच वेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या भूमिकेवर मात्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मविआ वंचितबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानादेखील अद्यापही मविआचे जागावाटप अंतिम झालेले नाही. मविआच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येते. वंचित मात्र १० ते १७ जागा लढवण्यावर ठाम राहिल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. अपेक्षित जागा मिळत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसला मात्र पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.