ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !

नांदेड : वृत्तसंस्था

राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरातच झोपलेल्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी उलटसूलट चर्चा रंगली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. बजरंग रमेश लखे (22), उमेश रमेश लखे (25) व रमेश होनाजी लखे (51) व राधाबाई रमेश लखे (44) अशी मृतांची नावे आहेत. बजरंग व उमेश हे सख्खे बंधू आहेत. रमेश व राधाबाई असे त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. तो सामाजिक कार्यात सक्रिय होता.

जवळा मुरार येथे रमेश लखे व राधाबाई लखे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना बजरंग व उमेश ही 2 मुले होती. हे एक सर्वसाधारण कुटुंब होते. अल्पभूधारक असूनही मोठ्या कष्टाने ते आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. पण बजरंग व उमेश या दोघांनी आज गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता त्यांचे आईवडीलही घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळले. हे पाहून गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला.

हे प्रकरण आत्महत्येचे आहे की, घातपाताचे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले असून, मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासानंतरच सत्य समोर येईल. पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तसेच या कुटुंबाचा कुणाशी वाद होता का? कौटुंबिक वादातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले का? किंवा त्यांचा काही घातपात झाला का? या अंगानेही पोलिस तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!