स्वामी भक्तांची होणार सोय : अक्कलकोट आगाराला मिळाल्या दहा नव्या बसेस !
आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला बीएस सिक्स मॉडेलच्या दहा नवीन कोऱ्या करकरकीत एसटी बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी, सकाळी या गाड्या डेपोस प्राप्त झाल्या.पहिल्या टप्प्यात पाच गाड्या दिल्या आहेत.आणखी दोन दिवसात पाच गाड्या येणार आहेत. उद्या रविवारी किंवा सोमवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते व एसटीच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेतून कोऱ्या करकरीत या बसेस दाखल झाल्या असून त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.याचा पाठपुरावा सातत्याने ते करत होते. मध्यंतरी परिवहन मंत्री सरनाईक यांनी राज्यात टप्प्याटप्प्याने ५ हजार नवीन बसेस दाखल होतील अशी माहिती दिली होती.
पण ते इतक्या लवकर येतील असे वाटले नव्हते.पण पहिल्याच टप्प्यात आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला दहा बसेस मिळाले आहेत.या आगारमध्ये सध्या एकूण ५५ बसेस आहेत यापैकी अनेक गाड्या या कालबाह्य झाल्या आहेत. तरी त्या रोडवर धावत आहेत.या आगारला गाड्यांची अत्यंत गरज होती.अक्कलकोट तालुक्याचे क्षेत्रफळ, प्रवाशांची संख्या आणि तीर्थक्षेत्राचे ठिकाण पाहता तालुक्याला प्रत्यक्षात ९० बसेसची गरज आहे परंतु टप्प्याटप्प्याने बसेस बदलण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये दहा बसेस मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पूर्वी खराब रस्ते आणि चांगल्या बसेस असे काहीसे चित्र होते.आता उलटे आहे.चांगले रस्ते आणि खराब गाड्या अशा प्रकारचे चित्र तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर नवीन गाड्या मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून देखील आनंद व्यक्त होत आहे.नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी देण्यास मदत होणार आहे. २९ कोटींचे हायटेक बस स्थानक आणि नवीन गाड्या येणे अशा प्रकारचा दुग्ध शर्करा योग हा अक्कलकोट साठी आला आहे. या गाड्यांचे पूजन आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होऊन त्या प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील,अशी माहिती आगार प्रमुख रणजीत साळवे यांनी दिली.
भाविकांची गैरसोय होणार नाही
पूर्वी बस स्थानक धोकादायक स्थितीत होते.त्यामुळे अक्कलकोटचे नाव खराब होत होते.यात लक्ष घालून महायुती सरकारकडून निधी मिळविला.नंतर गाड्यांचा प्रश्न निर्माण झाला.आता त्याही टप्प्याटप्प्याने चांगल्या आणण्याचा प्रयत्न करू आणि याठिकाणची प्रवासी सेवा कशी उत्तम होईल याकडे लक्ष दिले जाईल.जेणेकरून इकडे येणाऱ्या भाविकांना सुद्धा याचा त्रास होणार नाही.
सचिन कल्याणशेट्टी,आमदार