अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांची १४६ वी पुण्यतिथी सोमवारी मोठ्या भावाने साजरी होत आहे. यानिमित्त हजारो भाविकांची मांदियाळी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र यावर्षी तीव्र उन्हामुळे दरवर्षी पेक्षा गर्दी कमी होण्याची चिन्हे आहेत.मंदिर प्रशासनाने मात्र भाविकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे. उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी भाविकांना मंडप घालण्यात आला आहे. पहाटे गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे.यानिमित्ताने पहाटे ३ वाजता नगरप्रदक्षिणा व नामस्मरण,पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा, सकाळी ७ वाजता देवस्थानचे स्वामींना अभिषेक, सकाळी ११ :३० वाजता मंदिर समितीचे, पुरोहितांचे व अक्कलकोट राजघराण्याचे स्वामींना महानैवेद्य आरती, दर्शन, दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांना महाप्रसाद, सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शहरातून पालखी सोहळा, दि.७ मे रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत,अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. याप्रसंगी बोलताना इंगळे म्हणाले, श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सव म्हणजे तमाम स्वामी भक्त व अक्कलकोट वासियांच्या स्वामी भक्तीचा लोकोत्सव आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे नित्य दर्शन व धार्मिक कार्यक्रमांबरोबर श्रवण,मनन,चिंतन, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा इत्यादी श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे.