ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेने उघडलं खात, पुणे जिल्ह्यात ६१ पैकी ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने मिळवला विजय
मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वराज्य संघटनेचं खातं उघडलं आहे. राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचायतीत स्वराज्य संघटनेच्या रुपाली ठमके यांचा सरपंचपदी विजय झाला आहे.
राज्यात काल रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी १६ जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. याचे निकाल आज सोमवार हाती आले असून भाजपने २७४ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचा दावा केला आहे. एकूण ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक होती, यापैकी ६१ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध सरपंच निवड झाली.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जनतेचा भाजपलाच कौल असल्याचे सांगीतले आहे. त्यांनी भाजपला २७४, शिवसेना शिंदे गटाला ४१ तर उद्धव ठाकरे गटाला १२ ग्रामपंचायतीत यश मिळाल्याचं सांगीतले. तर काँग्रेसने ३७ आणि राष्ट्रवादीने ६२ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला असल्याचं म्हटलं. दरम्यान, राष्ट्रवादीने मात्र आम्ही १२८ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. पुणे जिल्ह्यात ६१ पैकी फक्त ८ जागीच भाजप पुरस्कृत आघाडीला विजय मिळाला आहे. तर ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.