ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुणवंत विद्यार्थी म्हणजे समाजाचा आधारस्तंभ !

समर्थ प्रतिष्ठानचा सत्कार समारंभ उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचं भक्कम पायाभूत साधन आहे आणि अशा शिक्षणात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे केवळ त्यांच्या यशाचं कौतुक नसून त्यांच्या माध्यमातून उभ्या पिढीला प्रेरणा देण्याचा मौल्यवान प्रयत्न असतो. असाच एक प्रेरणादायी सोहळा समर्थ प्रतिष्ठान, अक्कलकोट यांच्यावतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी एकूण ६० गुणवंत विद्यार्थ्यांसह जेईई परीक्षेत यश मिळवलेल्या २ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, बाबा निंबाळकर, डॉ. शिवराया आडवितोटे, एजाज मुतवल्ली, मल्लिनाथ स्वामी, स्वामीनाथ हिप्परगी, राजशेखर कापसे, किसन जाधव, मल्लम्मा पसारे, अविनाश मडीखांबे, सुनील गोरे, मोहन चव्हाण, प्रशांत शिंपी या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना प्रा. गणेश मूडेगावकर व संतोष गार्डी यांनी आधुनिक जगात योग्य दिशा कशी मिळेल, मूल्याधारित जीवनशैली कशी अंगीकारावी यावर मार्मिक मार्गदर्शन केले. मोबाईलच्या आहारी न जाता, जीवनात खऱ्या अर्थाने माणूस कसा व्हावं याचे मार्गदर्शन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिंडोळे यांनी केले. गेल्या १७ वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी बळ देणारा असतो,असे त्यांनी सांगितले. स्वागत रवींद्र वाघमोडे, आभार अप्पू संगापुरे, तर सूत्रसंचालन नितीन पाटील
यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेची खरी ओळख फक्त गुणपत्रिकेत नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या विचारांत, कृतीत आणि सामाजिक भानात असते. समर्थ प्रतिष्ठानने आयोजित केलेला सत्कार सोहळा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करतानाच त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीत सकारात्मकता, प्रेरणा आणि आत्मभान जागृत होण्यास नक्कीच मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!