धुळे : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले जात आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती ओस पडू लागल्या आहेत. शेतकरी आणि महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. शहरातील जेलरोड समोरील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी उद्धव ठाकरे यांची मंगळवारी प्रचारसभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना संपर्कप्रमुख अशोक धात्रक आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने महिला, गरीब, शेतकरी आणि तरुणांशी प्रतारणा करून महाराष्ट्राचे वैभव लुटले आहे राज्यात आणि देशात महिलांवर अत्याचार होत आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. महाराष्ट्राचे उद्योग पळवून नेले जात असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. कापूस, सोयाबीन आणि कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे. गुजरात राज्यात कांदा बंदी उठवली जाते; पण, महाराष्ट्रातील कांद्यावरील बंदी उठवली जात नाही, ही एकप्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत केलेली गद्दारीच आहे.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत. यामुळे राज्यातील औद्योगिक वसाहती आज ओस पडल्या आहेत यास केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जबाबदार असल्याचे ठाकरे म्हणाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचा प्रयत्न झाला तर ते आम्ही कदापीही होऊ देणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी नाना पटोले यांनीही मार्गदर्शन केले.