सोलापूर , वृत्तसंस्था
शिक्षकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील अनुदानित खासगी शाळांसह जिल्हा परिषदांच्या शाळांवरील जवळपास साडेचार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आले आहे. दरमहा पगारासाठी २२ ते २५ तारखेपर्यंत अंशदान वितरित होते, पण यावेळी तिजोरीत पैसा नसल्याने शिक्षकांच्या पगारीसाठी ते दोन दिवस विलंबाने वितरित करावे लागले. त्यामुळे शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार आता १ तारखेऐवजी ५ तारखेपर्यंत होईल, असे वेतन अधीक्षकांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा साधारणतः साडेपाच हजार कोटी रुपये लागतात. शासन निर्णयानुसार सर्व शिक्षकांचा पगार १ तारखेला व्हावा म्हणून २२ ते २५ तारखेपर्यंत अंशदान प्रत्येक जिल्ह्यांना वितरित केले जाते. त्यानुसार दरमहा वेळेत पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होतो. पण, विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरमधील लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे त्यासाठी देखील निधी लागणार होता. त्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी अंशदान सर्व जिल्ह्यांना वितरित केले आहे.
शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी अंशदान प्राप्त झाले असून सर्वांची पगार बिले देखील तयार केली आहेत. आता कोषागार कार्यालयात ती सादर केली जातील. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांवरील ९१०० व खासगी अनुदानित प्राथमिक शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांच्या पगारी ५ जानेवारीपर्यंत होतील. अशी माहिती कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी दिली आहे.
शिक्षकांचा पगार किमान ५ जानेवारीपर्यंत व्हावा, यासाठी वेतन अधीक्षक, प्राथमिक शिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यालयातील पगार बिलांची कामे पाहणारे कर्मचारी रविवारी (ता. २९) सुट्टी असतानाही कार्यालयात पगार बिले तयार करत होते. सर्वांची पगार बिले सोमवार किंवा मंगळवारी कोषागार कार्यालयाकडे पाठविली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील जवळपास साडेचार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी) पगार दरमहा १ तारखेला होतो. पण, अंशदान दोन-तीन दिवस उशिराने मिळाल्याने पगारासाठी चार-पाच दिवस विलंब होईल.