पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना पुणे येथील कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री भरधाव वेगात टेम्पाे चालवून वारकऱ्यांना मुक्काच्या ठिकाणी घेऊन जाणारा टेम्पो पलटी हाेण्याची घटना घडली अाहे.या अपघातात २० वारकरी जखमी झाले असून, याप्रकरणी दाेषी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागबाई नारायण बोखारे (वय ७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात टेम्पाे चालक विराेधात तक्रार दिली आहे. सदर फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध भादवि कलम २७९, ३३९७, ३३८, माेटार वाहन कायदा ११९/१७४,१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो ३० जून राेजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुक्कामी निघाला होता. कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक नवनाथ चोपडे याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेला टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली अाहे.
या घटनेत तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांचे डोके, हाताला दुखापत झाली, तसेच त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर अाहे. पोलीस उपनिरीक्षक एस देशमुख याबाबत पुढील तपास करत आहेत.