ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीड जिल्ह्यात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी बीड शहरालगतच्या सोलापूर – धुळे महामार्गावरील नामलगाव फाटा येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. हे सर्व भाविक पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. तेव्हाच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहर व तालुक्यातील शिदोड गावचे काही भाविक शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. तेव्हा भरधाव वेगातील एका कंटेनरने त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भयंकर होता की, 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. या घटनेत इतर काही भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशाल श्रीकिसन काकडे (रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), अमोल नामदेव गरजे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव), आकाश कोळसे, पवन जगताप, किशोर तोर (रा. बाबुलतरा, ता. गेवराई) अशी या अपघातात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. इतर दोघांची नावे समजू शकले नाहीत. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. या घनटेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळही असाच एक अपघात झाला होता. त्यात कंटेनरच्या धडकेतच 5-6 जणांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!