---Advertisement---

नवले पुल परिसरात भीषण अपघात : ९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी !

By team
On: November 14, 2025 10:35 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

नवले पुल परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहराला हादरा बसला. सातारा रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत भरधाव ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने हा अनर्थ घडला. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने सलग 20 ते 25 वाहनांना जबर धडक देत काही क्षणांतच भीषण साखळी अपघात घडवला.

धडकेमध्ये पुढे असलेली एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली गेली आणि क्षणार्धात पेट घेतला. काही सेकंदांतच कार आणि कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला. यात कारमधील पाच जण आणि कंटेनरमधील दोन जण जागीच होरपळून मृत्युमुखी पडले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना रोहित कदम (25) याचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. काही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आगीच्या ज्वाळा काही मिनिटांतच उंचावल्या. वाहने रस्त्यावर विखुरली आणि संपूर्ण मार्ग ठप्प झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत वाहनांचे फक्त सांगाडेच उरले होते.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये कारमधील स्वाती नवलकर (37), त्यांची सासू शांता दाभाडे (54), सासरे दत्तात्रय दाभाडे (58), चिखलीतील तीन वर्षीय मोक्षिता हेमकुमार रेड्डी, तसेच कार चालक धनंजय कोळी यांचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल असलेला रोहित कदम (25) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रकमधील मृत चालक आणि क्लिनर यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या दुर्घटनेत सय्यद कुटुंबातील काही सदस्य, सतीश वाघमारे, सोहेल सय्यद, 79 वर्षीय शामराव पोटे यांसह अनेकजण जखमी झाले असून पल्स हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींवर तातडीने उपचार केल्याने काहींचे प्राण वाचले. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून, मृतांच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नवले पुल परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!